दाढी वरून केलेल्या राणेंच्या टीकेला जरांगे पाटलांचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले…
'अरे कपडे घातले तरी तसाच दिसतो आणि कपडे काढले तरी तसाच दिसतो, तुझ्यात आहे काय बघण्यासारखं?’असं म्हणत नारायण राणेंनी जिव्हारी लागणारी टीका मनोज जरांगे पाटलांवर केली होती. तर ‘दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही. त्यांच्या अंगामध्ये तसे गुण असायला लागलात, असे म्हणत राणेंनी जरांगेवर निशाणा साधला होता.
दाढी राखणं म्हणजे मर्दपणाचं लक्षण आहे, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. दाढी वरून केलेल्या नारायण राणे यांच्या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून नारायण राणे यांनी मराठ्यांच्या अंगावर येऊ नये, असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. ‘ज्या लोकांनी दाढी वाढवली..त्यांच्याबद्दल नारायण राणे बोलले असतील. एखाद्याला दाढी ठेवणाऱ्यांबद्दल चीड असू शकते. तर दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण असते. पण मी त्यांना उत्तर नाही देत. शेवटी त्यांचं वय मोठं आहे. मी त्यांना दादा म्हणतो. त्यांना सन्मान देतो. पण सन्मान या शब्दाचा अर्थच त्यांना माहित नसेल तर मी काही करू शकत नाही.’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर नारायण राणे जे बोलताय ते देवेंद्र फडणवीस यांचे शब्द आहेत. त्यामुळे एकच सांगेल गोर -गरिब मराठे आणि मराठ्यांच्या अंगावर येऊ नका’, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना दिला आहे.