मनोज जरांगे पाटील अयोध्येला जाणार? म्हणाले, आम्ही पण कट्टर…
आज अयोध्येत राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठापना झाली. या पार्श्वभूमीवर अहमदनगरला भिंगार येथे मनोज जरंगे पाटील यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत आरती केली आहे. यावेळी भिंगार येथे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
अहमदनगर, २२ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून २० जानेवारीला मुंबईच्या दिशेने आपली पदयात्रा सुरू केली आहे. अंतरवाली हे गाव सोडताना मनोज जरांगे पाटील यांचे जागोजागी औक्षण करण्यात आले. यावेळी सर्वच गावकरी भावूक झाले होते. तर मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा कंठ दाटून आला होता. त्यांनी वाटेतच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आपल्या मुलाबाळांना आणि पत्नी पाहून त्यांना गहिवरून आल्याचे पाहायला मिळाले. आता मनोज जरांगे पाटील यांचा हा पायी मोर्चा अहमदनगरला भिंगार येथे पोहोचला आहे. आज अयोध्येत राम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठापना झाली. या पार्श्वभूमीवर अहमदनगरला भिंगार येथे मनोज जरंगे पाटील यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत आरती केली आहे. यावेळी भिंगार येथे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. तर आरक्षण मिळाल्यानंतर आयोध्याला जाणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाता हा लढा असाच चालू राहील. आता ही आरपारची लढाई असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.