‘आरक्षणावरच चर्चा की दंगली घडवण्यासंदर्भात?’, शरद पवार अन् एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून जरांगे पाटलांचा निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यात आज 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडली आहे. या भेटीवरूनच मनोज जरांगे पाटील यांनी दोघं नेत्यांच्या भेटीवर निशाणा साधला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमधील नेमकी कोणत्या विषयावर राजकीय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही. पण या बैठकीतली औपचारिक चर्चेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली असून दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, या दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटीवर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे. ‘आरक्षणाच्या मुद्यावरच चर्चा होती की दंगली लावण्याबाबत माहिती नाही.’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले तर मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही, असे म्हणत खोचक टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली.