जरांगे विधानसभा लढणार की आमदारांना पाडणार? भुजबळांचा कार्यक्रम करणार, जरांगेंचा पुन्हा इशारा
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली आणि सभांचा नाशिकमध्ये समारोप झाला. समारोपाची सभा भुजबळांच्या नाशिकमध्ये असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर पुन्हा मंत्री छगन भुजबळ आलेत. यावेळी त्यांनी करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा भुजबळांना दिला.
नाशिकमधील समारोप सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे वळवला आहे. यावेळी भुजबळांचा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. सांगलीतील ओबीसीच्या एल्गार सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना २८८ जागा लढवण्याचे आव्हान दिले होते. त्यावरून आधी नाशिकमधून तुमच्या जागा निवडून येतात का ते बघ? असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा आता संपलाय. २९ तारखेला निवडणूक लढवायची की आमदारांना पाडायचं याचा फैसला मनोज जरांगे पाटील करणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून तेही सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. मात्र ते शक्य नाही, अशी भूमिका सरकारने घेतली. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी पाडापाडीची भाषा वापरण्यास सुरूवात केली आहे.