मनोज जरांगे पाटलांच्या M फॅक्टरमुळं कोणाची पडणार विकेट? विधानसभेसाठी समीकरण ठरलं
विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार असणार आहे, याची घोषणा मनोज जरांगे पाटील हे येत्या ३ तारखेला करणार आहेत. त्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी जातीय समीकरण जुळवलंय. दलितांसह मुस्लिम समाजाला सोबत घेऊन लढण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी जातीय समीकरण फीट केलंय. मराठा, मुस्लिम आणि दलित या तीन जातीच्या समीकरणातून सत्ताधाऱ्यांना पाडून जिंकणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. काल अंतरवाली सराटी येथे मुस्लिम आणि बौद्ध धर्म गुरूंसोबत मनोज जरांगे पाटील यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा, मुस्लिम आणि दलित असं समीकरण सेट झालंय. एकेका मतदारसंघात चार ते पाच अर्ज भरण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. आता कोणाचा अर्ज ठेवायचा आणि कोणाचा काढायचा हे मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरणावरून ठरवलं जाणार आहे आणि याचीच घोषणा ३ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांचा अधिक जोर हा मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यात एकूण विधानसभेच्या ४८ जागा आहेत. स्वाभाविकच मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर भाजपचे उमेदवार मोठ्या प्रमाणात असतील. तसा डाव राखून ठेवल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय.