मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या होणार उमेदवारांची घोषणा, मनोज जरांगे म्हणाले…
उमेदवार देण्याची घोषणा केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांकडून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. किती ठिकाणी लढणार हे सांगणार नसून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या आल्यानंतरच उमेदवारांची घोषणा करणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. त्यानुसार उद्या ३ नोव्हेंबर असून कोणत्या उमेदवारांची घोषणा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं आहे. त्यासंदर्भात कोण-कोणत्या मतदारसंघात आपले उमेदवार उभे करायचे यावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आमच्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ज्या मतदारसंघाची निवड आम्ही करणार त्यावर आमचा एक उमेदवार उभा करणार बाकीच्या अर्ज मागे घ्यायला लावणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर आज आपापल्या मतदारसंघात बैठका घ्या, असं आवाहन अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना मनोज जरांगे पाटील यांनी केलं. त्यातून तुम्हीच तुमच्यातील एक जण ठरवा असं म्हणत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना मनोज जरांगे पाटलांनी विनंती केली. उद्या सकाळी सात वाजता राज्यातील सर्व उमेदवारांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये या, असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. त्यामुळे उद्या नेमकं मनोज जरांगे पाटील कोणत्या मतदारसंघात कोणाला उभं करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.