भाजप आमदारासमोर जोरदार घोषणाबाजी, महिलांना वाटलेल्या साड्या अन् पर्स मराठा आंदोलकांनी पेटवल्या
जालना येथे भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है... अशी घोषणाबाजी केली. इतकंच नाहीतर यावेळी आंदोलकांनी महिलांना वाटप केलेल्या साड्या आणि पर्स रस्त्यातच पेटवल्या.
विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होताना दिसणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घेताना दिसताय. दरम्यान, जालना जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत लाभार्थी महिलांच्या कार्यक्रमात गोंधळ पाहायला मिळाला. जालना येथे भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी महिलांना वाटप करण्यात आलेल्या साड्या आणि पर्सची राखरांगोळी केली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणीमध्ये ही घटना घडली. भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासमोर मराठा आंदोलनकांनी एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना वाटप केलेल्या साड्या आणि पर्स थेट रस्त्यातच होळी करत मराठा आंदोलकांकडून पेटवल्याचे पाहायला मिळाले.