बीड जिल्ह्यात आता कसं आहे वातावरण? पोलीस अधीक्षकांनी दिली सध्य:स्थितीची माहिती
VIDEO | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरूण गेल्या दोन दिवसांपूर्वी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. आक्रमक तरूणांनी बीडमध्ये एसटी बसेसवर दगडफेक केली, नेत्यांची घरं जाळली आणि रस्त्यावर जाळपोळ केली होती. बीड जिल्ह्यात कशी आहे सध्या परिस्थिती?
बीड, ३ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळाले होते. मनोज जरांगे यांनी जलत्याग केल्यानंतर मराठा समाजातील काही आक्रमक तरूणांनी बीडमध्ये एसटी बसेसवर दगडफेक केली, नेत्यांची घरं जाळली आणि रस्त्यावर जाळपोळ देखील केल्याचा प्रकार घडला होता. यासंदर्भात कोणती आणि किती जणांवर कारवाई झाली याची माहिती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलीये. बीड जिल्ह्यात आजची परिस्थिती निवळलेली आहे. बीड शहरातील जनजीवन सुरुळीत झाले असून सुरक्षित आहे. तर 300 हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये 101 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नंदकुमार ठाकूर यांनी म्हटले आहे. या आंदोलनकर्त्यात 9 आरोपी इतर जातीचे आहेत. दरम्यान यामध्ये आणखीन कोण कोण आहेत याचा तपास सुरू आहे. या सर्व प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 64 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.