त्यानं लय वाटोळं केलंय मराठा आरक्षणाचं, माझा एकच विरोधक… जरांगे पाटलांचा पुन्हा हल्लाबोल
'आपण लोकसभा निवडणुकीत नाही. या निवडणुकीत आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही. जे सगे सोयरे या विषयाच्या बाजूने आहे, त्याचा विचार करा. जे सगे सोयऱ्याच्या बाजूने नाही, त्यांना पाडा. त्यांचा पराभव असा करा की त्यांच्या दोन-तीन पिढ्या वर येऊ नये. त्यांना पाडण्यात आपला विजय आहे.'
राज्यात आपला एकच विरोधक आहे. इतर कोणाला आपण विरोधक मानत नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यात येवला वाल्याला सोडता मी कुणाला विरोधक मानले नाही. आपले कोणीच विरोधक नाही. त्यांना कुणी ओबीसी नेता मानत नाही. आपण लोकसभा निवडणुकीत नाही. या निवडणुकीत आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही. जे सगे सोयरे या विषयाच्या बाजूने आहे, त्याचा विचार करा. जे सगे सोयऱ्याच्या बाजूने नाही, त्यांना पाडा. त्यांचा पराभव असा करा की त्यांच्या दोन-तीन पिढ्या वर येऊ नये. त्यांना पाडण्यात आपला विजय आहे. मी कुणाला कॉल केला नाही की कुणाला मतदान करायचे हे सांगितले नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. यासह जरांगेंनी प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर झालेल्या शाईफेकीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर चपलांचा हार घालण्यात आला आहे. तसेच गाडीवर शाई फेकण्यात आली आहे, यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.