भरपूर पाणी प्या… उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह ‘या’ शहरात उष्णतेची लाट अन् उन्हाची काहिली
वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरतोय, उन्हामध्ये सतत काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होताना दिसतोय. कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे
मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय, वैषाख वणवा जाणवू लागलाय. दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागत आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरतोय, उन्हामध्ये सतत काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होताना दिसतोय. कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हामध्ये फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये उष्णता वाढत असल्याने नागरिकांना उलटी, चक्कर, निर्जलीकरण, बेशुद्ध पडणे, उष्माघात असा त्रास होतो. मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, मुंबई, रायगड आणि ठाण्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यासह कमाल तापमान हे ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वाढत्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना काम असेल तर घराबाहेर पडा आणि भरपूर पाणी प्या, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.
उन्हामध्ये तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा शरीरात असते. या यंत्रणेचे कार्य विस्कळीत झाल्यास नागरिकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने पाणी पिणे आवश्यक असते. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी येत्या काळात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन हवामान विभागाकडूनही करण्यात येतंय.