आमश्या पाडवींच्या हाती धनुष्यबाण, ऐन लोकसभेच्या तोंडावर शिंदे गटाला नवा चेहरा तर ठाकरे गटाला मोठा धक्का
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं आहे. आमश्या पाडवी यांच्यासह नंदुरबारमधील ठाकरे गटाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील आज शिंदे गटाच प्रवेश केला
मुंबई, १७ मार्च २०२४ : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतर ठाकरे गटातील आमदार आमश्या पाडवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं आहे. आमश्या पाडवी यांच्यासह नंदुरबारमधील ठाकरे गटाच्या इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील आज शिंदे गटाच प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमश्या पाडवी यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे आणि मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित होते. आमश्या पाडवी यांच्या राजकीय प्रवास हा 1995 पासून सुरु झाला. त्यांची दोन वेळा अक्कलकुवा पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली. त्यांनी अक्कलकुवा कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकपदही भुषवलं होतं. आमश्या पाडवी यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून ते जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते. आमश्या पाडवी यांचा दोन वेळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर 2022 ला आमश्या पाडवी यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्यात आली.