‘… तर तोंडाला काळे फासू’, आमदार अशोक पवार यांना शिक्रापूरच्या ग्रामस्थांकडून प्रवेशबंदी; पण का?
VIDEO | आमदार अशोक पवार यांना प्रवेशबंदी, काय झाले आरोप? ग्रामसभा आणि पालकसभेतून निर्णय जाहीर
पुणे, 29 जुलै 2023 | शिरुर तालुक्यातील शिक्रापूर-वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेची चुकीची माहिती विधानसभेत देवून शाळेची बेअब्रु करणा-या आमदार अशोक पवार यांना शिक्रापूरच्या वाबळेवाडी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा आणि पालकसभा घेवून गावबंदीचा निर्णय जाहीर केला. यापुढे वाबळेवाडीबद्द्ल बोलाल तर भेटतील तिथे तोंडाला काळे फासू असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी शाळाप्रकरणी ग्रामस्थांनी तातडीने पालकसभा घेत आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत शाळेचा प्रश्न चुकीच्या पध्दतीने मांडल्याच्या निषेधार्थ त्यांचा निषेध केला. या शिवाय त्यांना वाबळेवाडीत येण्यास यापुढे बंदी केली. यापुढे वाबळेवाडी प्रकरणी पुन्हा बोलाल तर पुणे नगर महामार्गावर त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन तर करुच शिवाय दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशाराही महिलांनी दिला.
गुरुवारी राज्याच्या विधानसभा अधिवेशनात आमदार अॅड.अशोक पवार यांनी वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत सर्रास २५ हजार प्रवेश फी घेवून प्रवेश दिले जातात आणि मुख्याध्यापकांसह बाहेरील दोन व्यक्ती हे पैसे स्विकारतात. या शिवाय सीएसआर मार्फत होणा-या कामाच्या फंडाचा हिशोब जिल्हा परिषदेला देत नसल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय वाबळेवाडीची दहा वीस मुले शाळेत असून उर्वरित मुले धनदांडग्यांची आहेत असे ते म्हणाले होते. ही सर्व माहिती राज्याचे दिशाभूल करणारी व शाळेची अब्रु काढणारी विधानसभेत त्यांनी मांडल्याने पालकांनी व ग्रामस्थांनी आज तात्काळ पालकसभा घेवून संतापाच्या भाषेत आमदार पवार यांचा निषेध तर केलाच शिवाय त्यांना गावबंदी करुन त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा निर्णय जाहीर केला.