‘शिवरायांच्या ‘त्या’ पुतळ्याचं उद्धाटन करणाऱ्या मोदींनी पहिले उठबशा काढाव्या अन् फडणवीसांनी एक नाहीतर…’, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची भावना आहे. दरम्यान, यावर आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ज्यांनी या शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं, भूमीपूजन केलं. त्यांनी उठबशा काढल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले मालवणच्या राजकोट किल्ल्यात जाऊन तिथे एक उठबशी काढली पाहिजे, असं मिश्कीलपणे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं. तर पुढे ते असेही म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक उठबशी काढली पाहिजे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन उठबशा काढाव्यात त्यांनी एक काढू नये, कारण त्यांची राज्यात अन् केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी उठबशा काढायला काय हरकत आहे. त्यांनी उठबशा काढल्यानंतर त्यांच्या सोबत सत्तेत आम्ही आहोत म्हणून आम्हीदेखील उठबशा काढू, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. इतकंच नाहीतर राजानं आपले गड-किल्ले सोडून ते आपल्या रयतेसाठी धावले. आग्र्यात कैद राहिले. म्हणून छत्रपती शिवरायाची ही संस्कृती आपण निर्माण केली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.