‘माझ्या पतीचा जीव घेतला, आता ते माझ्या…’, बाळू धानोरकर यांच्या पत्नीचा गंभीर आरोप
चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी धक्कादायक विधान करत गंभीर आरोप केले आहेत. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, खासदार साहेब गेलेत तेव्हापासून माझ्या पक्षातीलच काही लोक माझा विरोध करीत आहेत
चंद्रपूर, १२ मार्च २०२४ : पक्षांतर्गत विरोधामुळेच माझे पती खासदार बाळू धानोरकर यांचा जीव गेला, आता दुसरा जीव जाणार नाही, असं वक्तव्य आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केलंय. चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी धक्कादायक विधान करत गंभीर आरोप केले आहेत. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, खासदार साहेब गेलेत तेव्हापासून माझ्या पक्षातीलच काही लोक माझा विरोध करीत आहेत. या विरोधामुळेच माझा पतीचा जीव त्यांनी घेतला. आता ते माझ्या मागे लागलेत. एक जीव गेला मात्र आता दुसरा जीव जाणार नाही. याची काळजी मी घेणार आहे, असे त्या म्हणाल्या. खासदार साहेब गेल्यापासून आठ ते नऊ महिन्यापासून जे लोक माझा सर्वाधिक विरोध करीत आहेत, तेच लोक मी भाजपात जाणार अशा चुकीच्या अफवा पसरवताय. माध्यमांना पॅकेज देऊन चुकीच्या बातम्या पसवल्या जाताय. पण अशा कितीही अफवा पसरविल्या तरी त्याला मी घाबरणारी नाही. मी काँग्रेसची आहे, मी काँग्रेसच्या तिकिटावरच उमेदवारी लढविणार आहे, असा थेट इशारा आमदार धानोरकर यांनी विरोधकांना दिला आहे.