Mumbai-Goa Highway च्या दुरवस्थेवरुन मनसे आक्रमक, रविंद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल
tv9 Special Report | मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक, बघा टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १६ सप्टेंबर २०२३ | मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. रविंद्र चव्हाण यांच्याविरोधात मनसे नेत्यांनी आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. यावरुन दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात केली आहे. मनसेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाणांविरोधात आंदोलन केलं. अभियंता दिनानिमित्त रविंद्र चव्हाण यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात काही अभियंत्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. पण मनसेनं मात्र यावर आक्षेप नोंदवला.मुंबई-गोवा महामार्गाची वाट लावणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार का केला असा प्रश्न विचारत मनसे नेते आक्रमक झाले. त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. यावेळी मनसे नेते आणि रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानं तणावही निर्माण झाला. मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचं आश्वासन रविंद्र चव्हाणांनी दिलं होतं मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालं नसल्याचा दावा मनसेनं केला आहे.