‘…त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल’, मराठी माणसांवरील हल्ल्यांवर मनसे नेत्याचं मोठं भाष्य
मुंब्र्यातील कालची घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. तो मराठी मुलगा फळ घ्यायला गेला. फळ घेताना 100 रुपये किलो सांगितलं. तो बोलला 50 ला देणार का? तो हिंदीत बोलत होता, हा मुलगा त्याला बोलला, मराठीत बोल महाराष्ट्रात राहतो. त्यातून वाद सुरु झाल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात मराठी आणि हिंदी भाषेवरुन इतका वाद झाला की, मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावल्याचा प्रकार समोर आला. यावर मनसेकडून भाष्य करण्यात आलंय. गेल्या काही दिवसात मराठी माणसाच्या बाबतीत अपमानास्पद गोष्टी घडायला लागल्या आहेत. मुंब्र्यातील कालची घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. तो मराठी मुलगा फळ घ्यायला गेला. फळ घेताना 100 रुपये किलो सांगितलं. तो बोलला 50 ला देणार का? तो हिंदीत बोलत होता, हा मुलगा त्याला बोलला, मराठीत बोल महाराष्ट्रात राहतो. त्यातून वाद सुरु झाल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून सतत मराठी माणसावर हल्ले होत आहेत. भविष्यात यांची हिम्मत अशीच वाढायला लागली, तर मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल. माझी मराठी माणसाला विनंती आहे, एकत्र या. तुमच्यावर कोणी फटके टाकत नाही, म्हणून लांबून बघणार असाल आणि या सगळ्याकडे कानाडोळा करणार असाल, तर एकदिवस हा प्रसंग प्रत्येक मराठी माणसावर येईल, त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल, असं अविनाश जाधव म्हणाले. तर मराठी माणसावर होत असलेले हल्ले जर वाढत गेले तर महाराष्ट्रात मराठी माणसाच अस्तित्व विकोपाला जाईल. कल्याण, ठाणे, विरार आणि मुंबईतील जैन माणसाची घटना या सगळ्या घटना पाहिल्या, तर सत्ता परिवर्तनानंतर हिम्मत वाढत चालली आहे, असेही अविनाश जाधव म्हणाले.