‘सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची चादर बाजूला काढून महाराष्ट्रात फिरावं’, कुणाचा घणाघात
VIDEO | 'महाराष्ट्रातली जनताच सांगेल...', मनसे नेत्याचं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना थेट प्रत्युत्तर, काय केली टीका?
ठाणे : बाळासाहेबांचे वारसदार असल्याचा बनावटगिरीचा मुखवटा गळून पडला आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती. या टीकेला आता मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेची चादर बाजूला काढून महाराष्ट्रात फिरावं, महाराष्ट्रातली जनताच त्यांना सांगेल की बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण आहे, असं अविनाश जाधव म्हणालेत. कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Assembly Election 2023) भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करणारे ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं, मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नाराजीनंतर राज ठाकरे यांनी हे ट्विट हटवलं, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. तसंच बाळासाहेबांचे आम्हीच वारसदार असल्याचा बनावटगिरीचा मुखवटा गळून पडला आहे, अशी टीकाही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती.
याबाबत अंबरनाथमध्ये आलेले मनसे नेते अविनाश जाधव यांना विचारलं असता, त्यांनी सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं. सुषमा अंधारेंना फक्त बडबड करण्यासाठी ठेवलं असून त्या काय बोलतात, आजकाल महाराष्ट्रातली जनता त्यांना मनावर घेत नाही. जर त्यांना खरंच असं वाटत असेल की मुखवटा वगैरे आहे, तर एक दिवस यावं आणि साहेबांसमोर बसावं. त्यांना कळेल की खरा वारसदार कोण आहे. त्या जर नीट शिवसेना पक्षाची चादर बाजूला काढून महाराष्ट्रात गेल्या, तर महाराष्ट्रातली जनताच त्यांना पटवून देईल की बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण आहे, असं अविनाश जाधव म्हणाले.