खासदारकीसाठी आधी भिडले आता मनोमिलन; कल्याण लोकसभेत मनसे-शिंदे गटात चाललं तरी काय ?
VIDEO | राज्यात टोलवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र आलेत. त्यानंतर आता स्थानिक पातळीवरही आमदार, पदाधिकाऱ्यांनी आपले सूत जुळवून घेतले का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाणे, १४ ऑक्टोबर २०२३ | कल्याण लोकसभा मतदारसंघात गेले काही दिवसांपासून मनसे शिवसेना शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. मनसे आमदार राजू पाटील आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात खासदारकीवरून नाव न घेता एकमेकांविरोधात सडकून टीका झाल्याचे पाहायला मिळाले. असे असताना काल दिवा येथे मनसे आणि शिंदे गटामध्ये अनोखे मनोमिलन पाहायला मिळाले. एका कार्यक्रमादरम्यान राजू पाटील आणि शिंदे गटाचे ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी राजू पाटील आणि आमचा डीएनए एकच आहे. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. विकासकामांसाठी आम्ही नक्कीच एकत्र येऊ अशी भूमिका शिंदे गटानं मांडली. त्यामुळे राज्यात टोलवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र आलेत. त्यानंतर आता स्थानिक पातळीवरही आमदार, पदाधिकाऱ्यांनी आपले सूत जुळवून घेतले का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.