शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, विधानसभा निवडणुकीकरता शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, या निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता देखील सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपला जोरदार प्रचार करताना दिसताय अशातच निवडणुकीच्या आधी शेवटची सभा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी मनसेने दावा केला आहे. यासंदर्भात मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी भाष्य केले आहे. 18 नोव्हेंबरला 5 वाजता प्रचार संपत आहे. मात्र सभा संध्याकाळी होत असल्याकारणाने 17 नोव्हेंबरसाठी शिवाजी पार्क मैदान आरक्षित करण्यासाठी आम्ही अर्ज दिला आहे. 17 तारखेसाठी अन्य तीन पक्षांनी देखील मुंबई महापालिकाकडे अर्ज दिला असल्याची माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली. जेव्हा एकाच दिवसासाठी अनेक पक्ष एकाच ठिकाणासाठी अर्ज देतात तेव्हा प्रथम अर्ज देणाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं आणि आमचा अर्ज सर्वात प्रथम देण्यात आला होता.त्यामुळे नेहमीप्रमाणे आमचा अर्ज पहिला आलेला आहे. त्यामुळे शिवाजीपार्क हे मैदान सभेसाठी आम्हालाच मिळणार असल्याची माहिती मनसे नेते यशंवत किल्लेदार यांनी दिली. मुंबईतील मध्यवर्ती मैदान आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवाजी पार्क मैदानात शेवटची सभा घेणं याला एक ऐतिहासिक वारसा आहे. या मैदानाचा राजकीय वारसा बाळासाहेबांमुळे तयार झाला आहे तो मान्य करावा लागेल. शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेचा इम्पॅक्ट संपूर्ण महाराष्ट्रावर पडतो. त्यामुळे सर्वच पक्षांना असं वाटतं की आपली सभा शिवाजी पार्क मदैनात झाली पाहिजे, असेही यशंवत किल्लेदार यांनी म्हटले.