‘लाडकी बहीण’ स्वार्थासाठी, ऑक्टोबरचा हफ्ता दिल्यानंतर… ; राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले आहे. ही योजना स्वार्थासाठी आहे का? जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसतील अशी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे हे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजना स्वार्थासाठी आहे का? असा सवाल करत यासारख्या योजना सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी असतील तर वाईट परिणाम होतील. स्वार्थासाठीच्या योजनांमुळे राज्य खड्ड्यात जात असेल तर चुकीचं आहे. ऑक्टोबरचा हफ्ता दिल्यानंतर सरकारी तिजोरीत पैसे राहणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे शिल्लक राहणार नाहीत. जानेवारी महिन्यात राज्याची तिजोरी रिकामी होईल. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना आधी रोजगार द्या… समाजातील कोणताही घटक फुकट मागत नाही. शेतकऱ्यांची वीज मोफत मागितलेली नाही मग फुकट कशाला देता? असे अनेक सवाल राज ठाकरे यांनी केले आहेत. तर जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसतील अशी शंका राज ठाकरे यांनी उपस्थित केली आहे. बघा काय म्हणाले राज ठाकरे?