झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरेंसह मारला मिसळवर ताव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे. अशातच आज राज ठाकरे आपल्या पत्नीसह ठाण्यातील प्रसिद्ध मिसळवर ताव मारताना दिसले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे ठाणे टोलनाक्यावर जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल ताशा वाजवून फुलांचा वर्षाव करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत हे जंगी स्वागत झाल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर असून ठाण्यात 11 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेट देणार आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदे गटातील उपविभाग प्रमुख सचिन यादव याने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी न्यायालयात योग्य पुरावे सादर न केल्यामुळे आरोपीची सुटका झाली. यानंतर ठाण्यातील कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघासह पालघर जिल्हाचा देखील आढावा घेणार आहे. मात्र आज ठाणे दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी ठाण्यातील प्रसिद्ध मिसळवर ताव मारला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही सोबत होत्या.