शिंदे सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, ‘ही आनंदाची बाब, पण फक्त…’
'महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन', सरकारच्या टोलमाफीच्या घोषणेनंतर राज ठाकरेंकडून मनसैनिकांचं कौतुक
मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर आज रात्री बारा वाजल्यापासून हलक्या मोटर वाहनांना टोलमाफी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोल माफी देण्यात येणार आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, ‘एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन. टोल माफी व्हावी, या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही’, असे राज ठाकरे म्हणाले. तर मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, असेही राज ठाकरे म्हणाले.