आर्थिक शोषण, फसवणूक अन् घोटाळा… राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं मोठं पत्र
शिपींग क्षेत्रातील कामगारांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या कामगारांनी शिपींग क्षेत्रातील दोन लाख भारतीय सीफेरर्सची आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक होत असल्याची बाब ठाकरेंच्या निर्दशनास आणून दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंबंधी कारवाई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भलमोठं पत्र लिहिलं आहे.
मुंबई, ६ मार्च २०२४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले आहे. शिपींग उद्योगात होत असलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात पंतप्रधान मोदींना हे पत्र राज ठाकरे यांनी लिहिले आहे. या पत्रामध्ये शिपींगवरील कामगारांच्या पिळवणुकीचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्राच्या सुरूवातीस असे म्हटलंय की, ‘जय हिंद ! जय महाराष्ट्र !! महोदय…. देशाच्या अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्वाचा वाटा ज्या क्षेत्राचा आहे, त्या शिपिंग इण्डस्ट्रीतील काही अनुभवी, व्यावसायिक तज्ज्ञांनी नुकतीच माझी भेट घेतली आणि शिपिंग इण्डस्ट्रीशी संबंधित काही कामगार संघटनांमुळे सुमारे दोन लाख भारतीय सीफेरर्सची आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक होत असल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले. संबंधित प्रकरणातील आर्थिक घोटाळा महाप्रचंड असून त्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे आणि म्हणूनच आज हे पत्र मी आपणास लिहित आहे.’