बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं, राज ठाकरेंकडून ट्वीटद्वारे श्रद्धांजली
हृदयविकाराचा झटका आल्याने मनोहर जोशींवर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते आणि मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, ट्वीटच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे
मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते आणि मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, ट्वीटच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली.शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.’