‘उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील, फारफार तर…’; बॅग तपासणीवरून राज ठाकरेंचा खोचक टोला
उद्धव ठाकरेंची दोन वेळा बॅग तपासल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडीओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर तो व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला. यानंतर उद्धव ठाकरेंना विरोधकांनी चांगलंच घेरलं आहे.
लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली. तर दोन दिवसांपूर्वी वणी येथेही त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचे समोर आले होते. विरोधकांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील यावर भाष्य करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. निवडणूक आयोगाच्या लोकांना कुठे काय तपासायचं ते कळत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी खोचकपणे वक्तव्य केले आहे. तर ज्याच्या हातातून आजपर्यंत पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या बॅगेत फारफार तर हात रूमाल आणि कोमट पाणी असणार, अस म्हणत उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणी केल्याच्या घटनेवरून राज ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे. बॅग तपासणी केल्याच्या घटनेवरून उद्धव ठाकरेंनी केवढं अवडंबर केल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. ‘आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली करताय, अरे आमच्यापण बॅग तपासल्या आहेत. अरे येवढा काय तमाशा करताय’, अशी सडकून टीका राज ठाकरे यांनी केली आहे.