Raj Thackeray : ‘लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार’, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंचं ट्वीट
'सरकारनेच कालच लाडक्या बहीण नक्की कोणाला म्हणावं याचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केला आहे, निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असं दिसतंय', राज ठाकरेंचं ट्वीट
भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात ज्यांनी मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. त्या सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन, असं ट्वीट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. तर २ वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने पुण्यात ज्या भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या वाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचं तेंव्हा आम्ही स्वागत केलं होतं आणि हे स्मारक लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण इतक्या मोठ्या महापुरुषांच्या स्मारकांसाठी देखील आपल्याला कायदेशीर लढाया लढाव्या लागतात हेच दुर्दैव. पण आता हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच अपेक्षा, असे राज ठाकरे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, स्मारकात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आढावा घेणारा एखादा बहुभाषिक साउंड आणि लाईट शो, एखादी डिजिटल लायब्ररी असं काहीतरी असावं, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. तर सरकारनेच कालच लाडक्या बहीण नक्की कोणाला म्हणावं याचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केला आहे, निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असं दिसतंय. असो, असं धरसोडपण स्मारकाच्या बाबतीत दिसू नये, असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.