पवार यांच्या इशाऱ्यावरून राऊत शिवसेना संपवत आहेत, शिंदे गटातील ‘या’ नेत्याचा खळबळजनक आरोप
निवडणुकीपूर्वी ठाकरे यांचा पक्ष हा रिकामा झाल्याचे पाहायला मिळेल, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या एका खासदाराने केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. मोठे पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील तूतू-मैंमैं काही केल्या संपायचं नाव दिसत नाही. अशातच निवडणुकीपूर्वी ठाकरे यांचा पक्ष हा रिकामा झाल्याचे पाहायला मिळेल, असा गौप्यस्फोट शिंदे गटाच्या एका खासदाराने केला आहे.
प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटावर चांगलाच निशाणा साधत निवडणुकांपूर्वी ठाकरे गटात राहिलेले आमदार आणि खासदार शिंदे गटात येतील, आणि ठाकरे यांचा पक्ष रिकामा होईल,असा आरोप करत एकच खळबळ उडवून दिली. तर शरद पवार यांच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे, असा खळबळजनक आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. इतकेच नाही तर त्यांनी ठाकरे गटाचा उल्लेख शिल्लक सेना असा करत ठाकरे गटाला डिवचलं आहे.