कॅमेरा घेऊन सोमय्या शायनिंग मारायला गेले?, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा-मविआ नेते भिडले
घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी एका पेट्रोल पंपाच्या छतावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं. होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते आपसात भिडल्याचे पाहायला मिळाले. भाजप नेते किरीट सोमय्या, मिहिर कोटेचा, पराग शाह आणि महाविकास आघाडीचे नेते संजय दिना पाटील यांच्यात होर्डींग पडलेल्या ठिकाणी बाचाबाची झाली.
घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात सोमवारी संध्याकाळी एका पेट्रोल पंपाच्या छतावर भलंमोठं होर्डिंग कोसळलं यामुळे अख्खा पेट्रोल पंप दबला गेला. या घटनेमुळे १४ जणांचा मृत्यू झाला तर होर्डिंग खाली अडकलेल्या ७४ नागरिकांना बाहेर काढले असून जखमींवर जवळच्या राजावडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशातच प्रशासन आपल्यापरीने जीव वाचण्याचे प्रयत्न करतय. त्याचवेळी होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते आपसात भिडल्याचे पाहायला मिळाले. भाजप नेते किरीट सोमय्या, मिहिर कोटेचा, पराग शाह आणि महाविकास आघाडीचे नेते संजय दिना पाटील यांच्यात होर्डींग पडलेल्या ठिकाणी बाचाबाची झाली. किरीट सोमय्या घटनास्थळी आत गेल्यानं संजय दिना पाटील भडकले तर भाजप नेते बचावकार्यात अडथळे आणत होते, तर सोमय्या यांच्यामुळे बचाव कार्य काही काळ थांबवलं, असे संजय दिना पाटील म्हणाले. इतकंच नाहीतर कॅमेरा घेऊन किरीट सोमय्या आतमध्ये शायनिंग मारण्यासाठी गेले का? असा सवालही संतप्त होत संजय दिना पाटील यांनी केला.