Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? 5 सप्टेंबरपासून ‘या’ वाहनांना बंदी
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 7 सप्टेंबर रोजी राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी लाडका बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह काहींच्या घरातही गणपती बाप्पा विराजमान होणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? मुंबई-गोवा महामार्गावरून तुम्ही प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या 5 सप्टेंबरपासून मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहनांना बंदी आहे. 5 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरून अवजड वाहनांना प्रवास करणं बंद असणार आहे. इतकंच नाहीतर परतीच्या प्रवासासाठी 11 सप्टेंबरपासून ते 13 सप्टेंबरपर्यंतही अवजड वाहनांना वाहतूक बंद असणार आहे. गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव या सणाच्या निमित्ताने मुंबईकर चाकरमानी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रह परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. मात्र गणेशोत्सवकाळात अत्यावश्यक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्यास सूट देण्यात आली आहे. यामध्ये दूध, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वाहून नेणाऱ्या वाहनांना मुभा असणार आहे.