Mumbai Local Update : हवामान खात्याचा रेड अलर्ट पण पावसाची क्षणभर विश्रांती, मुंबई रेल्वेचे अपडेट्स काय?
मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली. मुंबईत झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं, घरं पाण्यात गेली तर काही रस्त्याची नदी झाल्याचेही पाहायला मिळाले. दुसरीकडे मुंबईची लाईफ-लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबईची लोकल मात्र विस्कळीत झाली होती. आज काय आहे परिस्थिती?
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने राज्यातील काही जिल्ह्यांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. अशातच कल्याण, ठाणे, मुंबई-मुंबई उपनगर, कर्जत, कसारा या भागात मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडवली. मुंबईत झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं, घरं पाण्यात गेली तर काही रस्त्याची नदी झाल्याचेही पाहायला मिळाले. दुसरीकडे मुंबईची लाईफ-लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबईची लोकल मात्र विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेची वाहतूक काल मुसळधार पावसाने अर्धा पाऊण तास उशिराने सुरू होती. तर आज लोकल दररोजप्रमाणे केवळ १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहे. यासह पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची वाहतूक ही ५ मिनिटं उशिराने सुरू आहे. तर हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ही सुरळीत सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास काहिसा दिलासादायक होत आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज ठाणे, कल्याण, मुंबई या भागासाठी रेड अलर्ट दिला होता. मात्र आज पावसाने काहिशी उसंत घेतल्याने मुंबईकरांचं दैनंदिन जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.