अजित पवार यांचे काल सासूरवाडीत, आज मुंबईपासून नागपूरपर्यंत बॅनरबाजी; राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
VIDEO | सासरवाडी पाठोपाठ नागपूरसह मुंबईतही अजित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री'चे झळकले बॅनर, काय राजकीय संकेत?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरून जोरदार चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या सासूरवाडीतही महाराष्ट्राच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा असं लिहिलेली बॅनर्स झळकले आहेत. धाराशीव जिल्ह्यातील तेर ही अजित पवार यांची सासूरवाडी आहे. तेरच्या चौकाचौकात हे बॅनर्स झळकले तर राज्याच्या उपराजधानीतंही ‘वचनाचा पक्का, हुकमाचा एक्का मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाचं पक्का’ अशी बॅनरबाजी नागुपरात पाहायला मिळाली. यानंतर मुंबईतही अजितदादा भावी मुख्यमंत्री असे लिहिलेले बॅनर्स झळकले आहेत. आज मुंबईतील चेंबूरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा आहे. ‘युवा मंथन… वेध भविष्याचा’ या विषयावर यावेळी मंथन होणार आहे. अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने नवी मुंबई ते चेंबूर आंबेडकर कॉलेजपर्यंत ‘अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…’ अशा आशयाचे बॅनर्स आणि पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अॅडव्होकेट निलेश भोसले आणि नितीन देशमुख यांनी हे बॅनर्स लावले आहेत. बॅनर्स लावून अजित पवार हे मुख्यमंत्री झाले तर…? असा सवाल जनतेला विचारण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची सध्या चेंबूर परिसरात जोरदार चर्चा आहे.