उर्फी जावेद हाजिर हो! अखेर चौकशी होणार, मुंबई पोलिसांकडून नोटीस
अंग प्रदर्शन महागात पडणार? मुंबई पोलिसांकडून उर्फी जावेदला नोटीस, कोणत्या पोलीस ठाण्यात हजर होण्याचे दिले आदेश
सार्वजनिक ठिकाणी अंग प्रदर्शन करणं उर्फी जावेदला चांगलंच महागात पडणार असल्याचे दिसतेय. या प्रकरणी शनिवारी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस बजावली आहे. अंबोली पोलीस ठाण्यात उर्फीची चौकशी होणार असून तिला आज हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ या उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. जो पर्यंत उर्फी तोकडे कपडे घालणं सोडणार नाही आणि अंगप्रदर्शन करणं थांबवणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती. दरम्यान, चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली.
चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेतल्यानंतर मुंबई पोलीस ठाण्यातील पोलीस आयुक्तांनी उर्फी जावेदच्या चौकशीचे आदेश दिलेत. तर या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.