दिवाळीच्या धामधुमीत राजकीय ‘फटाके’, 23 तारखेला कोणाचा बॉम्ब फुटणार? सत्ताधारी-विरोधकांचे आतषबाजीचे दावे
दिवाळीच्या धामधुमीतच विधानसभा निवडणूक आल्याने राजकीय आतषबाजी देखील जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष, सत्ताधारी आणि विरोधकांकडून सत्तेसाठी दावे-प्रतिदावे करताना फटाके फुटणार असणार, असं म्हटलं जातंय.
दिवाळीमध्ये आता राजकीय फटाके फुटण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच असे इन्कमिंगचे फटाके सुरूच राहतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर इलाका तुम्हारा और फटाका हमारा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला चॅलेंज दिलं आहे. दरम्यान, शिदेंनी धमाका म्हटल्यानंतर संजय राऊत यांनी देखील महायुतीला टोला लगावलाय. संजय राऊत यांनी दिवाळीत त्यांच्या कुवतीप्रमाणे लहान सहान फटाके फुटत असतात असं म्हटलंय. आता अॅटम बॉम्ब कोणाचा फुटणार हे तर २० तारखेला विधानसभेच्या मतदानातून महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे. मात्र ऐन दिवाळीत भाजपने मुंबई काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंपाचे संकेत दिलेत. तर दिवाळीमध्ये फटाके फुटतील मात्र आपल्या विजयाच्या एटमबॉम्ब फुटेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. इतकंच नाहीतर २३ तारखेला देव दिवाळी साजरी करणार असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यासोबच संजय राऊत यांचं वक्तव्यही चर्चेत आहे. दिवाळी आहे, कुणी फटाके फोडत असेल तर फोडू द्या, असं वक्तव्य संजय राऊत यांनी अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून केलंय.