नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
आम्ही कुणावर उपकार करत नाही. यातून मिळणारं जे समाधान आहे, त्याची किंमत करता येत नाही. सिनेमा आणि नाटकातून काम केल्याने पैसे मिळतात, सन्मान मिळतो. पण असं समाधान मिळणार नाही. हे त्याच्या पल्याडचं आहे. मृत्यूवर विश्वास ठेवला तर जगणं सोपं होतं. हे जगणं फार महत्त्वाचं आहे. उद्या जाणार आहोत याच्यावर विश्वास ठेवला तर आज छान जगता येतं. हे लक्षात आलं पाहिजे, असं नाना पाटेकर म्हणाले.
नाम फाऊंडेशनने गेल्या नऊ वर्षात जलसंधारणाची प्रचंड कामे केली आहेत. राज्यातील 1 हजार 32 गावात 9.35 टीएमसी पाण्याचं काम झालं. खडकवासला धरणाच्या पाण्याची संचय पातळी 1.75 टीएमसी आहे. पाच खडकवासला धरण होतील एवढं हे काम आहे, असं सांगतानाच विदर्भ, मराठवाडा, कोकण, तळकोकण, खान्देश पश्चिम महाराष्ट्र या सर्व ठिकाणी काम केलं जात आहे. सर्वाधिक जलसंधारणाचं काम पश्चिम महाराष्ट्रात झालं आहे, अशी माहिती प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दिली. हे काम आता फक्त महाराष्ट्रात राहिलं नाही. टाटा आम्हाला ज्वॉईन झाल्याने आता गुवाहाटी, आसाम, गुजरातसह सर्व ठिकाणी आमचं काम होत आहे. हे न संपणारं काम आहे. ते करतच राहिलं पाहिजे. आता यूपीबरोबर एमओयू होईल. मग छत्तीसगड आणि कर्नाटकाबरोबर एमओयू होईल, अशी माहिती नाना पाटेकर यांनी दिली.
स्वामिनाथन आयोग लागू करा. आयोगाची अंशत: अंमलबजावणी झाली आहे. पूर्ण झाली तर बरं होईल. त्यासाठी दिल्लीला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे. मकरंदला वेळ असेल तर घेऊन जाईल. तिकडे सातत्याने मांडलं पाहिजे. हा आयोग लागू झाला तर कलाकरांचा सर्वात मोठा सन्मान असेल, असं नाना पाटेकर म्हणाले.
आपला महाराष्ट्र साधू संतांचा आहे. त्यांनी आपल्यासाठी भरपूर केलं आहे. त्यातून काही घेतलं तर समाधान होतं. आपल्या संतांनी जे तत्त्वज्ञान दिलं त्यातून हे घडतंय. नाम फाऊंडेशन हे केवळ मकरंदमुळे तयार झालं. त्याची शेतकऱ्यांसोबतची नाळ कायम आहे. गेल्या नऊ वर्षापासून आम्ही काम करत आहोत. गावागावातून अनेक मंडळी काम करत आहेत, असं ते म्हणाले.