…तर ‘ते’ १६ आमदार अपात्र ठरतील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य
VIDEO | राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल येण्यापूर्वीच राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'प्रकरण माझ्याकडे येऊ द्या...'
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर साधारण येत्या १० मे नंतर म्हणजेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर हा निकाल येण्याचा अंदाज बांधला जात आहे. सत्तासंघर्षावर नेमका काय निकाल लागणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केले आहे. नरहरी झिरवळ म्हणाले, ‘ माझ्याकडे त्या 16 आमदारांचं प्रकरण आल्यास त्यांना अपात्रच करेन,’, असे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, आमदारांचं प्रकरण माझ्याकडे येऊ दे तर खरी. आल्यावर पाहू. मी त्या आमदारांना अपात्र म्हणून पाठवले तर ते अपात्रच होतील. माझ्याकडे आल्यावर त्यांना अपात्रच करेन, असं नरहरी झिरवळ म्हणाले. विरोधी निकाल लागला तर मी चुकीचा निर्णय दिला असं होईल. मी घटनेला धरुन निकाल दिला आहे. मग घटना चुकली असं म्हणता येईल का? मी दिलेला निर्णय बरोबर आहे, असा दावाही त्यांनी केला. माझ्याकडे हे प्रकरण येईल की नाही हे कोण पक्कं सांगू शकतं? कारण शेवटी कोर्ट कोर्ट आहे. आजही त्याचं महत्त्व आहेच, असंही झिरवळ यांनी सांगितलं.