जरांगेंविरोधात पोस्ट लिहिणं भोवलं, तोंडच काळं केलं; डॉक्टर म्हणतो, मीही शिवाजी महाराजांचा मावळा…
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधातील पोस्ट डॉक्टराने केली होती. या पोस्टमुळे चिडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलकांनी सिडको येथील डॉ. विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून त्यांच्या अंगावर शाईफेक केली.
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका डॉक्टरवर शाईफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून संबंधित डॉक्टरवर शाईफेक करण्यात आली आहे. नाशिकच्या सिडको भागात आयुर्वेद वैद्य डॉ. विजय गवळी यांचा निषेध करत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून डॉ. विजय गवळी यांच्यावर शाईने भरलेली बॉटल रिकामी करण्यात आली. इतकंच नाहीतर यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. हा सगळा प्रकार सुरू असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ केला. जरांगे पाटील यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट डॉक्टराने केली होती. या पोस्टमुळे आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या आंदोलकांनी सिडको येथील विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून त्यांच्या अंगावर शाईफेक केली. घडलेल्या प्रकारानंतर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरला माफी मागण्यास सांगितले. यावेळी मी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाच आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल त्याबद्दल क्षमस्व, असं डॉक्टर विजय गवळी यांनी म्हटले.