देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले बघा?
VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर अजित पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, पण...
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतच्या 2019 च्या पहाटेच्या शपथविधीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला होता. गेल्या तीन दिवसांपासून त्या गौप्यस्फोटाबद्दल अजित पवार यांनी कोणतेच भाष्य केले नाही. विशेष म्हणजे आज माध्यमांनी त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्नदेखील केला. पण अजित पवार यांनी गाडी न थांबवता तिथून निघून जाणं पसंत केलं. पण त्यानंतर अखेर अजित पवार यांना चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यावेळी पत्रकारांनी फडणवीसांच्या गौप्यस्फोटाबद्दलचा पहिलाच प्रश्न विचारला. पण त्यावर त्यांनी फार सावध प्रतिक्रिया दिली. “पहाटेच्या शपथविधीबाबत बोलणार नाही. मला बाकिच्यांबद्दल बोलायचंच नाही. मी त्याबद्दल बोलणार नाही. विषय संपला. मला त्याबद्दल बोलायचंच नाही. तुम्ही दुसरे काही विषय असतील ते बोला”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.