‘…तर संजय राऊतांसारखा कोणी करंटा असूच शकत नाही’, राष्ट्रवादीच्या नेत्याची जहरी टीका
‘एकनाथ शिंदेंना अशा प्रकराचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे’, असं म्हणत राऊतांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता.
‘संजय राऊत साहेबांना अजून राजकारण शिकायला अवधी आहे का?’, असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. ‘एकनाथ शिंदेंना अशा प्रकराचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारं आहे’, असं म्हणत संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यावर अमोल मिटकरींनी भष्य केले आहे. शरद पवार यांनी गेले ५० वर्ष महाराष्ट्रात राजकारण केलं. देशाचे ते मोठे आणि प्रमुख नेते आहेत. दरम्यान, पुरस्कार कोणी द्यायचा कोणी घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आता अद्याप संजय राऊत यांना तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे संजय राऊत यांच्या मनात खंत आहे, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली. पुढे अमोल मिटकरी असेही म्हणाले की, शरद पवार एक प्रगल्भ नेते आहेत. इतके वर्ष संजय राऊत महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा त्यांना शरद पवारांची वैचारिक प्रगल्भता कळली नसेल तर त्यांच्या सारखा कोणी करंटा असूच शकत नाही, अशी जहरी टीकाही संजय राऊत यांच्यावर अमोल मिटकरी यांनी केली.