‘इंजिन अन् मनसे घेऊन बसा, तुम्हाला बाकी काय…’, पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
पक्ष आणि चिन्हावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी थेट प्रत्युत्तर दिलंय. तर राज ठाकरेंवर टीका करताच मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून अजित पवारांवर थेट पलटवार करण्यात आला.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची नाहीत तर ते बाळासाहेब ठाकरें यांची आहेत. तसंच घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्ष हे शरद पवार यांचे अपत्य आहेत, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील आपल्या उमेदवारांचा प्रचार सुरू करताना पहिली सभा ही ठाणे जिल्ह्यात घेतली. ठाण्यातून मनसे उमेदवार अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीण येथून राजू पाटील हे विधानसभेच्या मैदानात उतरलेत. त्यांच्या प्रचाराच्या सभांचा श्रीगणेशा करताना राज ठाकरेंनी पक्ष आणि चिन्हावरून अजित पवारांसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. यावर अजित पवार यांना सवाल केला असताना त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. ‘इंजिन आणि मनसे घेऊन बसा, तुम्हाला बाकी काय करायचंय? लोकशाही बहुमताचा आदर केला जातो. पक्ष एकट्याच्या मालकीचा नसतो’, असं म्हणत अजित पवारांनी पलटवार केला. तर अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीका करताच मनसेच्या संदीप देशपांडेंनी त्यांना थेट उत्तर दिलंय.