शरद पवार यांच्या राजीनाम्यावर प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, म्हणाले, ‘पुन्हा पुन्हा काय रे ते…’
VIDEO | अजित पवार नसलेल्या शरद पवार यांच्या 'त्या' पत्रकार परिषदेवरून पत्रकारांनी अजितदादांना घेरलं अन् ते भडकले...
पुणे : काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेला अजित पवार नव्हते. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत अजित पवार यांना विचारले असता ते पत्रकारांवरच भडकल्याचे पाहायला मिळाले. पवार म्हणाले, ये… त्याच्याबद्दल पवार साहेबांनीच सांगितलं. पुन्हा पुन्हा काय रे ते… तिथं भुजबळ साहेब होते का?… होते? काय बोलतोय… अरे वेड्या 25 जणं आम्ही त्या कमिटीत होतो. पवार साहेबांना आम्ही भेटायला गेल्यानंतर पवार साहेब म्हणाले, त्यांचे कलिग म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेला हजर राहावं. प्रांत अध्यक्ष म्हणून जयंतरावांनी उपस्थित राहावं. केरळचे प्रतिनिधी म्हणून आमदार आले होते. त्यांनी उपस्थित राहावं. नॉर्थमधील नेते होते. पीसी चाको निघून गेले. अशा ठरावीक लोकांनी उपस्थित राहण्याचं ठरलं. पत्रकार परिषदेत चारपाच खुर्च्या असतात. त्यामुळे साहेब म्हणाले, बाकी येऊ नका. साहेबांचा आदेश शिरसावंद्य. काही अडचण?, असा सवाल अजितदादांनी सरतेशेवटी प्रश्न विचारलेल्या पत्रकाराला केला.