Ajit Pawar : बीडचा पालकमंत्री कोण? पालकमंत्र्यांची यादी कधी होणार जाहीर? अजित पवारांनी अखेर सांगितली तारीख
अजित पवार यांना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेणार का? असा सवाल केला असता त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली. बघा काय म्हणाले अजित पवार?
बीड आणि परभणीच्या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून भाष्य केले आहे. ‘बीड जिल्ह्यात अतिशय चांगले एसपी पाठवलेले आहेत. ते अतिशय कडक आहेत की नाही ? याची तुम्ही चौकशी करून पाहा. त्यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ न देता तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था नीटपणे राखायची, असं पूर्णपणे त्यांना सूचना आणि अधिकार देण्यात आले आहेत’, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. दरम्यान, अजित पवार यांना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेणार का? असा सवाल केला असता त्यांनी थेट प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, या राज्यातील मंत्रिपदं, पालकमंत्रीपद, विभागाचा विस्तार यासंदर्भातील सगळा अधिकार हा राज्याचे मुख्यमंत्री जे असतात त्यांच्याकडे असतो, असं अजित पवार यांनी सांगितले. तर गेल्या सरकारमध्ये ते अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे होते, कारण ते राज्याचे प्रमुख होते. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर सर्व गोष्टीला वेळ झाला हे मात्र खरं असलं तरी मुख्यमंत्री १९ तारखेला दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले.