‘दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा, आमचं म्हणणं…’, अजित पवारांसमोर मस्साजोगच्या गावकऱ्यांचा संताप
बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर केवळ विरोधकच नाही तर बीड जिल्ह्यातील काही आमदार सुद्धा चिंता वर्तवू लागले आहेत. त्यामुळे बीडचा बिहार होतोय की बीडमध्ये गँग्स ऑफ वासेपूर सारख्या टोळ्या तयार होतायंत? अशी चिंता आता बीड जिल्ह्याला सतावतेय.
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात प्रकरणात सुरेश धस यांनी पुन्हा गंभीर आरोप करत मुख्य आरोपीच्या अटकेची मागणी केली. तर दुसरीकडे अजित पवारांनी मस्साजोग गावात जाऊन भेट घेतली. तेथेच अजित पवारांच्या समोर धनंजय मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला १३ दिवस उलटून गेल्यानंतरही मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. दरम्यान, सत्ताधारी प्रमुख नेत्यांपैकी काल पहिल्यांदाच अजित पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी तपासावरून गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे तीन आरोपीसह तीन जण फरार आहेत. तर विष्णु चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले हे अटकेत आहेत. तर तक्रारीनुसार ज्या पवनचक्की प्रकल्पाकडून दोन कोटींच्या खंडणीसाठी सरपंचाची हत्या करण्यात आली, असा संशय आहे त्याच २ कोटी खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णु चाटे हे आरोपी आहेत. विष्णु चाटे हा राष्ट्रवादीचा केज तालुक्याचा अध्यक्ष राहिला आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा उजवा हात आहे. अशातच दोन मुंडे आले नाहीत, त्यांना कशांचं वाईट वाटलं? असा सवाल सुरेश धस यांनी केला.