‘ब्राह्मण वर्गात फक्त पुरूषांचं शिक्षण होतं महिलांचं नाही’, छगन भुजबळ यांचं वादग्रस्त वक्तव्य, नवा वाद पेटणार?
VIDEO | 'आम्ही सरस्वती, शारदा देवीला पाहिलं नाही अन् आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं नाही', राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद पेटणार?
नाशिक, १९ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतंच शिक्षण मर्यादित होतं.’, असे छगन भुजबळ म्हणाले. तर ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं सांगतानाच काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. आम्हाला मात्र, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले केली आहेत, असेही पुढे छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद पेटणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आपल्याला शिक्षण दिलं. शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुले केली ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांनी. त्याचं कायद्यात रुपांतर केलं ते बाबासाहेब आंबेडकर यांनी. भाऊराव पाटील आदी महापुरुषांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली. बाकीच्यांना सरस्वती आवडते, काहींना शारदा आवडते. आम्ही काय पाहिलं नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिलं नाही. आम्हाला शिक्षण दिलं ते या महापुरुषांनी दिलं. त्यामुळे ते आमचे देव आहेत. ते तुमचेही देव असले पाहिजेत. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले.