सिल्व्हर ओकवरील भेटीत काय झालं? भुजबळ स्पष्ट म्हणाले, शरद पवारांनी मला बोलवलं अन्…
'मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. सव्वा दहा वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले....', पवार-भुजबळांच्या भेटीत काय झालं?
छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. या भेटीनंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत या भेटीमागील कारण सांगितलं. मी आज शरद पवार साहेबांकडे सकाळीच गेलो होतो. त्यांची वेळ घेतली नव्हती. ते आजारी असल्याचं कळलं होतं. सव्वा दहा वाजता गेलो होतो. ते तब्येत बरी नसल्याने झोपले होते. त्यामुळे मी एक दीड तास थांबलो. ते उठले आणि मला बोलावलं. ते बिछान्यावरच झोपलेले होते. तब्येत बरी नव्हती. मी बाजूला खुर्ची ठेवून बोलत होतो. दीड तास चर्चा केली. मी कोणतंही राजकारण घेऊन आलो नाही. मंत्री आणि आमदार म्हणून आलो नाही. पक्षीय भूमिका नाही, असे भुजबळांनी शरद पवार यांच्याशी भेट घेतल्यावर प्रथम स्पष्ट केले. पुढे भुजबळ असेही म्हणाले की, राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलात जात नाही. काही लोक ओबीसी, धनगर आणि वंजारी आणि माळी समाजाच्या दुकानात मराठा समाज जात नाही. अशी परिस्थिती झाली आहे. राज्यातील ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, ही शांतता निर्माण झाली पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी शरद पवार यांच्याकडे या भेटीदरम्यान केली.