एकनाथ खडसे यांचं भाजप प्रवेशावर मोठं वक्तव्य, ‘तर मी पुन्हा राष्ट्रवादीत…’
एका बॅनरमुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या बॅनरवरून चर्चेला उधाण आलं असून एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीतच राहणार का? असा सवाल केला जातोय. तर सोशल मीडियावरही एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या पोस्टवर झळकल्याने एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चेची तर्क-वितर्क लढवल्या जात आहे.
एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. या बॅनरवर शरद पवार, मुलगी रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे फोटो पाहायला मिळाले. हे बॅनर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बोदवड उत्पन्न बाजार समितीकडून लावण्यात आले असून त्या शुभेच्छा बॅनरवर एकनाथ खडसे यांचा फोटो झळकल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी भाजप पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. भाजपच्या केंद्र नेतृत्वाला भेटून एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडला असताना थेट एकनाथ खडसे यांचा फोटो थेट राष्ट्रवादीच्या बॅनरवर पाहायला मिळाला. अशातच मोठी प्रतिक्रिया देत खडसे म्हणाले, ‘भाजपमध्ये प्रवेश करणार अशी विनंती मी केली होती. मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नसून मी अद्याप राष्ट्रवादीचा सदस्य आहे. राष्ट्रवादीच्या सदस्यपदाचा राजीनामा शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. पण त्यांनी तो स्वीकारला नाही. मी राष्ट्रवादीचा आमदार अजून आहे. अशा स्थितीत मी आहे. पण मी आणखी काही दिवस भाजपची वाट पाहिल. नाहीतर माझा मूळ पक्ष राष्ट्रवादी असून तो पुन्हा जॉईंन करणार आहे’, असे एकनाथ खडसे म्हणाले.