Eknath Khadse स्पष्टच म्हणाले, ‘आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलणं म्हणजे…’
VIDEO | 'सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे शिवसेनेचया अपात्र 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी ही सलग सुरू होणे अपेक्षित होते मात्र...', आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरील सुनावणीवर काय म्हणाले एकनाथ खडसे?
जळगाव, १५ सप्टेंबर २०२३ | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर गुरूवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी आपल्या पक्षकारांची बाजू मांडली. शिंदे गटाने आपल्याला याचिकेशी संबंधित कागदपत्रेच मिळाले नसल्याचं सांगत दोन आठवड्यांची मुदतही मिळावी अशी मागणी केली. दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी ही सलग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र ही सुनावणी दोन आठवडे पुढे ढकलण्यात आली असून याबाबत वेळ काढूपणा केला जात असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. सुनावणी पुढे ढकलणे म्हणजे जे अपात्र होणार आहेत त्यांना संरक्षण देण्याचा प्रकार असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले. तर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे अपात्रतेबाबत सुनावणी सुरू होणे अपेक्षित होते त्यामुळे ताबडतोब सुनावणी होऊन याबाबत निर्णय होणे अपेक्षित असल्याचेही खडसे म्हणाले.