राष्ट्रवादीला खिंडार, सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय उद्या भाजपचं कमळ हाती घेणार
VIDEO | सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, भाजपची कुठं वाढणार ताकद?
पुणे : राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुरंदरमधील मोठं नाव असलेले अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत भाजपचं कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार अशोक टेकवडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुरंदर येथील भाजपची ताकद वाढणार असून तिथली राजकीय गणितं देखील येत्या काही दिवसात बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयानंतर पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. गेल्या महिन्यांपासून अशोक टेकवडे हे राष्ट्रवादीत नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहतील असं वाटत नव्हतं. आज ना उद्या ते पक्षाला रामराम करतील अशी चर्चा सुरूच होती. अखेर या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.