‘नार्वेकरांनी निकाल असा दिला की कोर्ट अजून त्यावर विचार करतंय’, शिवसेना-राष्ट्रवादीच्या निकालावर जयंत पाटलांचा टोला
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षाच्या वादाबाबत भाष्य केले. राहुल नार्वेकर यांच्याकडून सहकार्य मिळाल्याचे म्हणत असताना जयंत पाटील म्हणाले,
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत भाषण केले. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पक्षाच्या वादाबाबत भाष्य केले. नार्वेकरांकडून सहकार्य मिळाल्याचे म्हणत असताना जयंत पाटील म्हणाले, ‘मागच्या अडीच वर्षात अनेक गोष्टी झाल्या. कोर्ट म्हणून तुम्हाला अधिक काळ काम करावं लागेल. आम्ही आमची बाजू मांडायचो. तुम्ही न्यायदानाचं काम करतानाही आम्हाला चांगलं सहकार्य केलं. त्यांनी दुजाभाव केला नाही. आम्ही साक्ष दिली तेव्हा त्यात सुधारणा करून दिल्या. फार संयमी काम केलं’, असं म्हणत जयंत पाटील यांनी पुन्हा विधानसभा अध्यक्ष झालेल्या राहुल नार्वेकर यांचे कौतुक केले. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह या प्रकरणाच्या निकालावर जयंत पाटील यांनी खोचक भाष्य करत राहुल नार्वेकर यांनी टोमणा मारल्याचे पाहायला मिळाले. ‘राहुल नार्वेकर यांनी निकाल असा दिला की त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला नाही. एक चीफ जस्टिस घरी गेले. त्यांनी त्याला हात लावला नाही. त्यावर भाष्य केलं नाही. तुम्ही कुणाला डिस्क्वॉलिफाय केलं नाही. त्याबद्दलही उशिरा का होईना तुमचे आभार मानेल. कोर्ट आता निकालच देत नाही. त्यामुळे तुमचे आभार मानणं आणि नवा डाव सुरू करणं एवढंच आमचं काम आहे.’, असं म्हणत जयंत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांचे आभार मानले.