Rohit Pawar | परीक्षा अचानक रद्द होणं चुकीचं, रोहित पवारांचा सरकारलाच घरचा आहेर
विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. रोहित पवार आज अहमदनगरमध्ये बोलत होते.
अहमदनगर : आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा मेसेज मिळाला. त्यामुळे राज्यभरात महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जातोय. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं केली. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. रोहित पवार आज अहमदनगरमध्ये बोलत होते. ‘लवकरात लवकर म्हणजे काही दिवसांत परीक्षा पुन्हा घेण्यात यावी. ज्या काही त्रुटी आहेत त्या सोडवाव्यात. त्यासाठी एखादा वरीष्ठ अधिकारी नेमावा. आणि ज्यावेळी परीक्षा घेतली जाईल तेव्हा सर्वसामान्य मुलं एसटीचा प्रवास करतील तो तिकिटाचा खर्चही सरकारच्या माध्यमातून कसा देता येईल याबाबत विचार करावा. पण काहीही झालं तरी युवकांच्या भविष्याशी कुठल्याही सरकारनं खेळू नये, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राजेश टोपे साहेब यात लक्ष घालत आहेत. लवकरात लवकर परीक्षा होतील, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.