रावसाहेब दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् शरद पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले, ‘… त्याचं हे लक्षण’
रावसाहेब दानवेंनी अर्जून खोतकरांचं स्वागत करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये रावसाहेब दानवेंनी एका कार्यकर्त्यांला लाथ मारल्याचे पाहायला मिळतंय. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांसह विरोधकांनी जोरदार भाजपवर निशाणा साधलाय.
भाजपचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर रावसाहेब दानवेंचा चांगलाच संताप व्यक्त केलाय. अशातच शरद पवार आणि संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पक्षात सहकारी आणि कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं, त्यांचं हे लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली तर संजय राऊत रावसाहेब दानवे यांच्या कृतीवर भाष्य करताना म्हणाले, ‘भाजपच्या नेत्यांना विचारा ही त्यांच्या पक्षांची संस्कृती आहे का? देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा…’, असा प्रतिसवालच राऊत यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना केला. तर भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अशा लाथा मारून तुम्हाला गार-गार वाटतंय का? तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची भूमिका, स्थान काय आहे हे दिसतंय यावरून असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.